Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Republic Day Special : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह , राजपथावरील चित्तथरारक प्रदर्शनाने दिपले डोळे ….

Spread the love

आज देशभरात भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रपतींनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले. दरम्यान, राजपथावर विविध चित्ररथांच्या माध्यमातून देशाच्या सामर्थ्याचे, शौर्याचे आणि संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. या प्रमुख सोहळ्यात सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी ध्वाजारोहण झाले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. यावर्षी ब्राझिलचे राष्ट्रपती जेर मेसिअस बोलसोनारो हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.


आज सकाळपासूनच प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध राज्यांच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहणासह सुरक्षा दलांच्या परेड आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतरही दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  आणि दिल्लीत राजपथावर विशेषतः भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी यंदाही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी राजपथावर लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्यावतीने चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करून देशवासियांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर देशाकडे असलेल्या शस्त्र-अस्त्रांचे दर्शनही घडवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी  प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थिती लावली.

लद्दाख येथे १७००० फुटांवर धवजरोहण 

दरम्यान लडाख येथे तैनात असलेल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या (आयटीबीपी) पोलिसांनी उणे २० डिग्री तापमानात तब्बल १७,००० फूट उंचावर राष्ट्रध्वज हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गात प्रजासत्ताक दिन साजरा केला. मुंबईत शिवाजी पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यावेळी राज्यपालांनी जीपमधून सज्ज असलेल्या पोलीस दलाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस तुकड्यांची परेडद्वारे देण्यात आलेली मानवंदना स्विकारली.

संघाचे मुख्यालयात ध्वजारोहण 

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उत्तराखंड येथील एका मंदिरात देवासमोर तिरंग्याच्या तीन रंगामध्ये फुलांची आरास करण्यात आली होती. दिल्लीच्या शाहीन बाग येथे देखील ध्वाजरोहण करण्यात आले. मध्य रेल्वेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे ध्वजारोहण करण्यात आले.

आसामात चार  ठिकाणी स्फोट 

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आसाममध्ये एकामागून एक चार बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिब्रूगडमध्ये दोन स्फोट घडले तर एक सोनारी येथे आणि दुसरा पोलीस स्टेशनजवळील दुलियाजन येथे घडला आहे. सध्या या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांच्या माहितीनुसार, या दोन्ही स्फोटांच्या घटनांची माहिती कळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. या स्फोटांमागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्यात येत आहे.

या स्फोटांमागे आसाममधील बंडखोर संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असाम-इंडिपेंडंट (उल्फा-आय) या संघटनेचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या बंदी असलेल्या संघटनेने आसामच्या जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. सर्वसाधारणपणे अशा संघटना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच बंदचे आवाहन करीत असतात, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!