शबाना आझमी यांची प्रकृती आता स्थिर , अनेक मान्यवर भेटीसाठी धावले तर पंतप्रधान मोदी , लता मंगेशकरसह अनेकांच्या पार्थना
आज दुपारी ३.३० च्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर एम जी एम मध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात हलविण्यात आले असून या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
शबाना आझमी यांना सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी यांनी माहिती दिली असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे, असे शेट्टी यांनी नमूद केले आहे.
दरम्यान शबाना आझमी यांना अपघात झाल्यानंतर त्यांच्या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे देशभर पसरले असून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच स्तरांतून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शबाना यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. शबाना यांना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली. भारतरत्न लता मंगेशकर यांनीही शबाना यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. शबाना यांच्या प्रकृतीची बॉलिवूडलाही काळजी लागली आहे. शबाना यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी रुग्णालय गाठत आहेत. जावेद अख्तर यांचा मुलगा अभिनेता फरहान अख्तर तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात पोहचला. उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेता अनिल कपूर, अभिनेत्री तब्बू यासह अनेक सेलिब्रिटी व मान्यवरांनी रुग्णालयात जावून शबाना यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.