Aurangabad : नागरीकांनी निःसंकोचपणे पोलिसांकडे तक्रार करावी – आयुक्त प्रसाद, १ कोटी ४७ लाख रूपयांचा जप्त मुद्देमालाचे वाटप

औरंंंगाबाद : पोलिस हे जनतेच्या रक्षणासाठी असून नागरीकांनी त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे निःसंकोचपणे कराव्यात. पोलिसांकडे आलेल्या तक्रारींचा शंभर टक्के निपटारा करण्यात येतो अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. शहरातील विविध पोलिस ठाण्यात गेल्या पाच वर्षापासून पडून असलेल्या जप्त मुद्देमालाचे मुळ मालकांना मंगळवारी (दि.७) वाटप करण्यात आले. यावेळी चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याचे पाहुन अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असल्याचे चित्र दिसून आले.
शहराच्या विविध भागातून चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत गेल्यावर तो पोलिस ठाण्यात जप्त असतो. गेल्या पाच वर्षात शहरातील विविध १७ पोलिस ठाण्यात जप्त मुद्देमाल पडून होता. पोलिस स्थापना दिनानिमित्त सुरू असलेल्या सप्ताहात पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते १ कोटी ४७ लाख २ हजार २५५ रूपये किंमतीचा मुद्देमाल मुळ मालकांना परत देण्याचा कार्यक्रम पोलिस आयुक्तालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शहरातील जवळपास ११४ गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल मुळ मालकांना परत देण्यात आला. त्यामध्ये दुचाकी वाहने, बुलेट, ऑटो रिक्षा, मोबाईल फोन, घरगुती वापराची भांडी व इतर किंमती साहित्याचा समावेश होता. चोरांकडून जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांच्या मदतीने परत मिळतो हे पाहुन अनेकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ झाला असल्याचे यावेळी दिसून आले.
जप्त मुद्देमाल वाटपाच्या कार्यक्रमास पोलिस आयुक्त चिरंजीस प्रसाद यांच्यासह उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, गुन्हे शाखेचे मोहरील भाऊराव राठोड, दत्तात्रय गढेकर, सुनील बडगुजर यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी मानले.
सौभाग्याचे लेणे मिळाले परत
मंगळसूत्र म्हणजे महिलांचे सौभाग्याचे लेणे असते, गेल्या वर्षभरात चोरीला गेलेल्या मंगळसूत्रापैकी चोरट्यांकडून जप्त केलेले मंगळसूत्र शारदा प्रसाद शर्मा, शिला पदमाकर मुळे यांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आले. चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळाल्याचे पाहुन महिलांनी पोलिस आयुक्तांचे आभार मानले.