हृदयद्रावक : पैशा अभावी उपचाराविना झालेल्या मुलाच्या मृत्यूच्या विरहात पित्याचीही आत्महत्या….
सहा वर्षाच्या एकुलत्या एक मुलाला योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्यानंतर दुखी: झालेल्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) दुपारी आंबेडकरनगर भागात घडली. नागसेन किसन मोकळे (३९, रा.आंबेडकरनगर एन-७) असे या व्यक्तीचे नाव आहे.
नागसेन मोकळे हे ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने फायनान्सवर ऑटोरिक्षा घेतला होता. काही महिन्यांपूर्वी हप्ते थकल्याने फायनान्सच्या लोकांनी ऑटोरिक्षा जप्त केला. हाताला काम नसल्याने कुटुंबाची उपासमार होऊ लागली. त्यामुळे पत्नीने खाजगी रुग्णालयात साफसफाईचे काम सुरू केले. दीड महिन्यांपूर्वी मुलाला अचानक ताप आला . दुपारी घरी नागसेन आणि मुलीच घरी होत्या. पत्नी दवाखान्यात होती. मुलाला ताप आल्याची माहिती पत्नीला दिल्यानंतर तिने काहीजणांकडे उपचारासाठी पैसे मागितले. थोडेपैसे घेऊन पत्नी घरी पोहोचली. तोपर्यंत मुलाचा ताप वाढला होता. त्याला खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांनी जास्त पैसे लागतील, असे सांगितले. पैसे नसल्याने पती-पत्नीने मुलाला घाटीत नेले. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याने पुन्हा खाजगी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मोकळे कुुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पैशाअभावी आणि योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का वडिलांना बसला होता. दीड महिन्यांपासून ते दुखा:तच होते. त्यातच बचतगटाकडून उचलेल्या कर्जाचा हप्ताही दोन दिवसांवर आला होता. पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने नागसेन यांनी सोमवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी कामावरून घरी आल्यानंतर सायंकाळी ४ वाजता पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांच्या मदतीने नागसेन यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून साडेसहा वाजता मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ.पवार करीत आहेत.