Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एकीकडे पंतप्रधान सांगतात , देशात कुठेही डिटेंशन सेंटर नाहीत तर कर्नाटकात तयार करण्यात आले आहेत डिटेंशन सेंटर !!

Spread the love

एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कुठेही डिटेंशन सेंटर नाहीत असे जाहीर वक्तव्य करतात तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने पूर्वीच डिटेंशन सेंटर उभारले असल्याचे वृत्त उघड झाले आहे. या वृत्तानुसार बेकायदेशीर घुसखोरांसाठी बेंगळुरूपासून ४० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नेलमंगलाजवळ हे सेंटर उभारण्यात आले असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर आभार सभेला संबोधित करताना देशात कुठेही डिटेंशन सेंटर नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले  होते. मात्र, आम्ही कर्नाटकात घुसखोराना ठेवण्यासाठी डिटेंशन सेंटर उभारले असून घुसखोरांना ठेवण्यासाठी ते पूर्णपणे तयार असल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या सामाजकल्याण खात्याचे आयुक्त आर. एस पेड्डप्पैया यांनी “टाइम्स ऑफ इंडिया”शी बोलताना सांगितले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान कर्नाटक सरकारमधील गृहविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही  या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रसिद्ध वृत्तानुसार कर्नाटकात हे डिटेंशन सेंटर जानेवारी महिन्यात उभाण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न होता. परंतु ,  केंद्र सरकारच्या काही सूचनांमुळे ते उभारण्यास विलंब लागला. मात्र, हे सेंटर सुरू झाल्यापासून अजून एकाही घुसखोराला या सेंटरमध्ये आणण्यात आलेले नाही. विदेश प्रादेशिक नोंदणी कार्यालयाद्वारे घुसखोरांचा तपास करून त्यांना अशा सेंटरमध्ये पाठण्याचे काम राज्य सरकारच्यावतीने करण्यात येते. आम्ही अशा घुसखोरांच्या प्रतीक्षेत आहोत. या  सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, असे पेड्डप्पेया यांनी सांगितले असल्याचे म्हटले आहे.

प्रारंभी या ठिकाणी एक वसतीगृह होते. नंतर कर्नाटक सरकारने या वसतीगृहाचे रुपांतर डिटेंशन सेंटरमध्ये केले. या डिटेंशन सेंटरमध्ये एकूण ६ खोल्या आहेत. तसेच एक स्वयंपाकाची खोली आणि एक सुरक्षा चौकी आहे. या सेंटरमध्ये एकूण २४ लोक राहतील इतकी क्षमता आहे. तसेच इथे एक टेहळणी मनोराही उभारण्यात आला असून सेंटरभोवती संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ३५ तात्पुरते डिटेंशन सेंटर असल्याची माहिती कर्नाटक सरकारने हायकोर्टाला दिली होती. विदेशी कायद्यांतर्गत राज्य सरकारने आतापर्यंत ६१२ प्रकरणांचा छडा लावला असून विविध देशांचे ८६६ नागरिक आढळून आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!