Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाची सजगता ,पोलिसांची सतर्कता महत्वपूर्ण डॉ. नागनाथ कोडे

Spread the love

औरंगाबाद :  महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजाची सजगता आणि पोलीसांची सतर्कता महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पोलीस सहआयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी ‘ महिला सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲङ श्रीमती अर्चना गोंधळेकर, संचालक (माहिती) गणेश रामदासी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.

डॉ. नागनाथ कोडे यावेळी म्हणाले, समाज ,पोलीस ,प्रशासन या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे औरंगाबादमध्ये गेल्या तीन चार वर्षात महिला सुरक्षा संदर्भात चांगले वातावरण आहे. गुन्हा करु पाहणाऱ्यांना कायद्याचा जरब बसवण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग सक्रीयतेने प्रयत्नशील आहे. शहरात दामिनी पथक, पोलीस गस्त या विविध उपक्रमाव्दारे महिलांना, वृध्दांना तातडीने सहाय्य उपलब्ध करुन देण्याचे काम पोलीसांमार्फत केल्या जात आहे. कोणत्याही वेळी दामिनी पथकाच्या 9159042444 या क्रमांकावर दुरध्वनी केल्यास तसेच 8390022222 या क्रमांकावर व्हाटअप केल्यावर घटनास्थळी पोलिस पथक सात मिनिटाच्या आत पोहचते. तसेच 100 या क्रमांकावर 24 तासात कधीही फोन केल्यास पोलीसद्वारे प्रतिसाद मिळून आवश्यक ती मदत गरजूंना तातडीने उपलब्ध करुन दिल्या जाते. पिडीत महिलांना त्यांच्या सोबत घडलेल्या अपप्रकाराबाबत विना संकोच व्यक्त होता यावे, पोलीसांकडे तक्रार दाखल करता यावी यासाठी प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पोलिस स्टेशनवर महिला अधिकारी /कर्मचारी हे दिवसरात्र उपलब्ध असतात. तसेच महाविद्यालय, शाळा परिसरात साध्या वेषात पोलीस महिला गस्त मोठया प्रमाणात सुरु असून याद्वारे छेडछाड करु पाहणाऱ्या, अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना तात्काळ पोलीसाद्वारे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. महिला दक्षता समिती, तक्रार निवारण समित्याद्वारे योग्य समुपदेशन व इतर आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जाते.पिडीतांना तातडीने सर्व सुविधा सहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने समिती भरीव प्रमाणात कार्यरत असून डॉक्टर, वकील, मानसोपचार तज्ञ या सर्वांचा त्यात सहभाग घेण्यात येतो असे सांगून श्री. कोडे म्हणाले, महिलांना पूर्णपणे सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने निर्भया सेफ्टी सिटी प्रस्ताव तयार केला असून तो पुढील मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात आला आहे.

निर्भया सेफ सिटी या अंतर्गत बसस्थानक, बस, निर्जनस्थळी अशा विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. तसेच या कॅमेऱ्यात अस्पष्ट असलेल्या प्रतिमांची योग्य ओळख पटवून देणार ॲनालिटीकल किट ही अद्यावत सुविधा या ठिकाणी विकसित करणार आहोत,असे सांगून श्री.कोडे म्हणाले ,पोलीसांच्या भरीव प्रयत्नांमुळे महिला तक्रारीत घट होत असून जनजागृती, कायद्याचे ज्ञान, पोलीस कारवाईचा धाक यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूरक वातावरण तयार करण्यात यंत्रणा यशस्वी होत आहे. अनुचित प्रकार घडला तर काय कार्यवाही करावी याबाबत दामिनी पथक ,दिदी पथक या उपक्रमाद्वारे शाळा, महाविद्यालयांतून जनजागृती केल्या जात आहे. दुर्घटनेतील पिडीतांची माहिती ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. कायद्यात तशी तरतूदच आहे त्यामुळे तक्रार दाखल करण्यास महिला मुली पालकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन श्री. कोडे यांनी यावेळी केले.
मुली महिलांना निर्भयपणे बाहेर वावरता येईल असे सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांची पोलीसांची भूमिका महत्वाची आहे. पण त्याहून आवश्यक बाब आहे ती समाजाची, पुरुषांची मानसिकता बदलण्याची आणि हे काम कुटुंबातून होणे गरजेचे आहे. मुलांची योग्य जडणघडण होण्यावर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. कोडे यावेळी म्हणाले.
ॲङ गोंधळेकर यांनी यावेळी , महिलां आणि मुलींच्या, बालकांच्या संरक्षणासाठी पॉस्को सारख्या अनेक प्रतिबंधात्मक कायद्यांची तरतूद असून निर्भया प्रकरणानंतर कायद्यात आमूलाग्र बदल करण्यात आल्याचे सांगितले. कायदा हा विपरीत परिस्थितीत निर्माण होतो .निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या दृष्टीने कायद्यामध्ये उल्लेखनीय बदल करुन मोठया सुधारणा करण्यात आल्या आहेत. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारा कायदा ,अल्पवयीन म्हणजे 18 वर्षाखालील मुला,मुलींना लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण देणारा पॉस्को कायदा , यासह इतर पूरक कायद्यामध्ये शिक्षेच्या तरतूदीत,व्याप्तीत वाढ करण्यात आली आहे,असे सांगूण श्रीमती गोंधळेकर म्हणाल्या ,भारतीय राज्यघटनेला सामाजिक न्याय प्रस्थापित होणे अभिप्रेत आहे. भारत देशात आजही पुरुषसत्ताक कुटुंबपध्दतीची संस्कृती अबाधीत असून स्त्री पुरुष समानता, स्त्रीचे स्वातंत्र्य , सुरक्षा याबाबी सक्षमतेने रुजलेल्या नाहीत.प्राचीन काळापासून ,ब्रिटीश कालखंडे ते आजच्या आधुनिक युगापर्यंत समाजरचनेत ,बाह्य तंत्रात्मक गोष्टीत ज्या प्रमाणात बदल झाले त्या तुलनेत स्त्रीयांच्या जीवनात, त्यांच्या बाबतच्या मानसिकतेत बदल झालेला नाही.
बालविधवा, सतीप्रथा, स्त्रीयांवरची बंधने , तिला दिला जाणारा दुय्यम दर्जा यागोष्टी कालबाह्य होणे गरजेचे आहे मात्र ते पूर्णपणे बंद झालेले नसून वेगळया स्वरुपात असल्याचे आजही बघायला मिळते. ही मानसिकता बदलण्यासाठी कुटुंबातच स्त्रीया,मुलींना आदराची वागणूक, मानाचे स्थान, सुरक्षा मिळणे हे क्रमप्राप्त ठरते कारण घरापासून महिला मुलींचा आपण योग्य आदर राखला पाहिजे हा संस्कार घरातील मुलांवर झाला तर त्यातून आपोआप जबाबदार पुरुषांचा समाज आकाराला येईल. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा योग्यरित्या नियंत्रितपणे करण्याची सजगताही आता कुटुबांत वाढवण्याची गरज आहे. कायदा हा कुठल्याही समस्यावर अतिंम समाधान होऊ शकत नाही. तर कायदा वापरण्याची स्थितीच ओढवणार नाही , यादृष्टीने समाजाने, कुटुबांने , प्रत्येकाने आपली मानसिकता बदल्यण्याची गरज असल्याचे मत श्रीमती गोंधळेकर यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकात श्री. रामदासी यांनी समाजातील महिलांच्या सुरक्षितेत प्रसार माध्यमांची भूमिका ही प्रभावी असल्याचे म्हटले . वृत्तपत्रांमध्ये गेल्या काही काळात आमुलाग्र बदल झाला आहे. आधीच्या वर्तमानपत्रात गुन्हेगारीची बातमी शोधून काढावी लागत होती तर आजच्या दैनिकात सकारात्मक, चांगली बातमी शोधावी लागत आहे. एवढा मोठा बदल आपल्या भोवतालात होत असल्याचे बघायला मिळत आहे. गुन्हेगार बनण्यास अपप्रेरणा देण्याऱ्या ,प्रवृत्त करणाऱ्या बाबी कशा रोखता येईल ,यादृष्टीने विचार होणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पत्रकांराची,प्रसार माध्यमांची भूमिका चौथास्तंभ म्हणून खूप महत्वपूर्ण ठरणारी आहे. यासर्व पार्श्वभूमीवर शासन, न्याय व्यवस्था ,पोलीस आणि समाज म्हणून आपण सर्वच प्रयत्नशील असणे हे महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी गरजेचे असल्याचे श्री. रामदासी यावेळी म्हणाले . आभार प्रदर्शन श्री. चिलवंत केले. या कार्यशाळेस पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!