Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

थेट दिल्लीहून : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि भाजपच्या पडद्यामागील हालचाली काय चालू आहेत ?

Spread the love

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारची चर्चा चालू असली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय हालचालीमुळे काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण शरद पवार राजकीयदृष्ट्या कधी काय भूमिका घेतील याचा अंदाज लावणे कठीण आहे . त्यातच, मोदी सरकार शरद पवार यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रपतिपदी नियुक्त करणार असल्याच्या वृत्ताची भर पडली असून, महाराष्ट्रात राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत हातमिळवणी करावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत का ? असा प्रश्नही चर्चिला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी  भाजपसोबत हातमिळवणी करावी म्हणून पवार यांच्यावर पक्षाचे दिल्लीतील दोन खासदार दबाव आणत असून ते अजित पवार यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा दिल्लीत सुरू होती. ‘भाजपसोबत केंद्रात तीन मंत्रिपदे आणि राज्यात सत्तेत मोठा वाटा’, अशा फॉर्म्युल्यासह शरद पवार यांना जुलै २०२२मध्ये राष्ट्रपतिपद देण्याची ऑफर असल्याची चर्चा सुरू होती. आपला जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी राष्ट्रवादी संभ्रम निर्माण करीत असल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेविषयी काँग्रेस आणि शिवसेनेला कोणतीही अडचण नसून, शरद पवार यांनी आपली राजकीय विश्वासार्हता राखण्यासाठी सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास हातभार लावला पाहिजे, असे मत या पक्षांचे नेते व्यक्त करीत होते.

दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त सत्ता स्थापण्याचा प्रयत्न असताना, भाजपचे नेतेही सर्व घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहेत. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा ठाम विश्वास भाजपच्या गोटात व्यक्त केला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे आधीच शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन होणे कठीण असून, भाजपशी जुळवून घेण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नसेल, असाही सूर भाजपमध्ये आहे. त्यादृष्टीने डावपेच आखले जात आहेत.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचं बिनसलं आणि त्यामुळे निवडणुकीआधी बॅकफूटवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता केंद्रस्थानी आले आहेत. कारण शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र अशातच आता दिल्लीच्या राजकारणात नवी चर्चा जोर धरत आहे. या चर्चेमुळे कार्यकर्त्यांबरोबरच प्रसार माध्यमेही संभ्रमात पडली आहेत.

भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे. तसंच राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीला सन्माजनक वाटा देण्याचं आश्वासनही दिलं आहे, असं वृत्त एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीसह इतर काही माध्यमांनी दिलं आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या या कथित ऑफरबद्दल अद्यापपर्यंत कोणत्याही नेत्याने अधिकृत भाष्य केलेलं नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!