Aurangabad Crime : कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार, मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत घडलेला प्रकार

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नेलेल्या १७ वर्षीय मुलीला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून तरुणाने तिच्यावर दोनवेळा अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आकाश प्रकाश ठोकळ (१९, रा. चिकलठाणा) असे त्याचे नाव असून, पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सिडको, एन-४ भागातील १७ वर्षीय मुलगी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास किराणा दुकानात दुधाची पिशवी आणण्यासाठी गेली होती. यावेळी ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा मॉल व मैत्रिणींकडे शोध घेतला. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही मुलगी घरी परतली. यावेळी आईने तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने मित्र आकाश ठोकळ याने तिला मित्र सनी याचा वाढदिवस आहे. सगळे मित्र त्याचा वाढदिवस देवळाई चौकात घेतलेल्या एका किरायाच्या फ्लॅटमध्ये साजरा करणार आहोत. त्यामुळे तू सुध्दा माझ्यासोबत चल असे म्हणाला. मुलीने त्याला सोबत जाण्यासाठी नकार दिला. मात्र, त्याने बळजबरी तिला दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री सनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचवेळी आकाशने तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले. रात्री फ्लॅटमधील एका खोलीत आकाशने तिच्याशी दोनवेळा अतिप्रसंग केला. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यावर मुलीने घर गाठले. हा प्रकार समजल्यानंतर मुलीसह तिच्या आईने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी आकाश ठोकळ याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.