Aurangabad Crime : गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई , न्यायालयात बनावट जामिनदारांच्या रॅकेटचा पर्दाफाश

पावणेदोन वर्षांपुर्वी पकडलेला दुकानदार पुन्हा सक्रिय
बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड हस्तगत
गोपनीय अर्ज प्राप्त होताच न्यायालयाला बनावट कागदपत्रे सादर करुन जामिन घेणा-या रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी पावणेदोन वर्षांपुर्वी बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड बनवून देणा-या दुकानदाराला पुन्हा अटक केली आहे. या रॅकेटने औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक यासह विविध न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करुन आरोपींची जामीन घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी दिली. या रॅकेटमधील महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर सात जणांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. – कव्हर फोटो : मुक्या आरोपी : शेख मुश्ताक शेख मुनाफ
१. अयुब खान रमजान खान २. शेख जावेद शेख गणी ३. वसीम अहेमद शकील अहेमद, नालासोपारा ४. पूनम सावजी गणोरकर
गेल्या काही दिवसांपुर्वी पोलिस आयुक्त कार्यालयाला गोपनीय अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जात बनावट कागदपत्राआधारे आरोपींची जामीन घेणारे रॅकेट सक्रिय असल्याचे म्हटले होते. त्यावरुन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार शिवाजी झिने, सुनील बडगुजर, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, शिपाई प्रभाकर राऊत, संजय जाधव, संदीप क्षिरसागर यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयासमोर सापळा रचून शेख मुश्ताक शेख मुनाफ (३६, रा. रशीदपुरा, हिनानगर) याला पकडले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना पाच महिलांचे आधारकार्ड तसेच चार सातबारा, कटकटगेट जसवंतपुरा येथील समरीन खान मुश्ताक अली खान या महिलेच्या नावाचे एैपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी) आणि दोन मोबाईल आढळले. त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी कसून चौकशीला सुरूवात केली. तेव्हा त्याने आणखी अकरा जणांची नावे सांगितली. त्यावरुन पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. तेथील वसीम अहेमद शकील अहेमद (४६, रा. साईकुटी बिल्डिंग, नालासोपारा, जि. पालघर) याला मुंबईच्या किल्ला न्यायालयासमोरुन ताब्यात घेतले. त्यानंतर शहरातील अयुब खान रमजान खान (५२, रा. बायजीपुरा, इंदिरानगर), शेख जावेद शेख गणी (२०, रा. अंबरहिल, जटवाडा रोड), लालचंद बद्रिलाल अग्रवाल (५१) आणि टिपलेश अनिल अग्रवाल (२३, दोघेही रा. लेबर कॉलनी) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलिस उपायुक्त मिना मकवाना, सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
………
आठ ते दहा हजारात घ्यायचे जामीन….
आरोपींची जामीन घेण्यासाठी हे रॅकेट न्यायालयाच्या आवाराभोवती फिरायचे. किरकोळ गुन्ह्यातील आरोपींची जामीन घेण्यासाठी बनावट आधारकार्ड, एैपत प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पॅनकार्ड न्यायालयाला सादर करायचे. त्यासाठी ते आरोपीच्या नातेवाईकाकडून आठ ते दहा हजार रुपये घ्यायचे अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
…….
यापुर्वी आवळल्या गणोरकरच्या मुसक्या….
हडकोतील एन-१३, भागात असलेल्या पूनमचंद दिगंबरसा गणोरकर (५२, रा. एन-१२, हडको) याच्या आधार सेंटरवर २२ मार्च २०१८ रोजी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कारवाई केली होती. त्यावेळी तत्कालीन अधिका-यांनी महंमद हबीब महंमद हनीफ (२८, रा. बारापुल्ला गेट, कोतवालपुरा), सय्यद हमीद सय्यद हबीब (४५, रा. मुजफ्फरनगर, एन-१३, हडको) आणि पूनमचंद गणोरकर यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पिवळ्या आणि केशरी रंगाचे असे सुमारे ५५ रेशनकार्ड, १९ आधारकार्ड, लॅपटॉप, संगणक, कलर प्रिंटर, फोटो पेपर, पेपर कटींगचे साहित्य, ५० आयकॉनिक स्टिकर असे साहित्य जप्त करण्यात आले होते. मतदान कार्ड बनविण्यासाठी उपयोगात येणारे आयकॉनिक स्टिकर देखील हस्तगत करण्यात आले होते. त्यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली होती. तेव्हा एकाच व्यक्तिचे चार आधारकार्ड बनविल्याचेही समोर आले होते.
…….
सात जणांना १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडी….
सातही जणांच्या ताब्यातून न्यायालय, तलाठी, तहसील कार्यालय, अन्न-धान्य वितरक अधिकारी यांच्या शासकीय कार्यालयाच्या स्वाक्ष-या व शिक्के असलेले दस्ताऐवज हस्तगत करण्यात आले आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी चार महिला आरोपींची पोलिस कोठडीचा हक्क अबाधीत ठेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर सात जणांची १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.