Aurangabad Crime : प्रेयसीसाठी दुचाकी चोरणारा कॉलेजकुमार गुन्हे शाखेच्या जाळ्यात

प्रेयसीसोबत मौजमजा करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरणा-या कॉलेजकुमारला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशाल सुभाष चाबुकस्वार (२१, रा. माळी गल्ली, जय भद्रा शाळेजवळ, रांजणगाव) असे त्याचे नाव आहे.
वाळुज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी भागात असलेल्या नर्सरी कॉलनीत तिघे चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय पवार यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पथकातील सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, पोलिस नाईक संजयसिंह राजपुत, विठ्ठल सुरे, गोविंद पचरंडे, शिपाई ओमप्रकाश बनकर, पंढरीनाथ जायभाय, अमर चौधरी आणि ज्ञानेश्वर पवार यांच्यासह धाव घेतली. यावेळी तेथे आलेल्या विशाल चाबुकस्वार याला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने दोन अल्पवयीन बालकांच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने साथीदार राजेंद्र राऊत याच्या मदतीने पैठण एमआयडीसीतून एकाच रात्री तीन दुचाकी आणि रांजणगाव शेणपुंजी परिसरातून दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले.
प्रेयसीसाठी दुचाकी चोरी…
घराशेजारी राहणारी चाबुकस्वारची प्रेयसी एका कंपनीत कामाला आहे. तिच्यासोबत मौजमजा करण्यासाठी चाबुकस्वार दुचाकी चोरी करत होता अशी माहिती गुन्हे शाखा पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.