परभणी जिल्यातील सोनपेठ येथे जुन्या वाड्याचे छत आणि भिंत कोसळून पिता -पूत्र जागीच ठार

परभणी जिल्ह्यातील सोनपेठमध्ये पाडव्याची पहाट सुरू होत असताना सततच्या पावसाने घराची भिंत कोसळून बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे सोनपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण टेकाळे (४५) आणि मंदार टेकाळे (८) अशी मृत पावलेल्या बाप-लेकांची नावे आहेत. तर या दुर्घटनेत कस्तुरबा टेकाळे(४०) या जखमी झाल्या आहेत.
टेकाळे कुटुंब सोनपेठमधील देवी मंदिर पसिरात गावरस्कर यांच्या जु्न्या वाड्यात भाड्याने राहात होते. पाडवा सुरू होत असतानाच पहाटे साडेचार वाजता घराची भिंत कोसळली. भिंत कोसळत असताना टेकाडे पिता -पुत्राच्या अंगावर वरील फरशीचा स्लॅब कोसळला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पहाटे भिंत पडल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर आजूबाजूच्या रहिवाश्यांनी वाड्याकडे धाव घेतली. बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र, कस्तुरबा टेकाडे सतत आवाज देत होत्या. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कस्तुरबा यांना बाहेर काढले. अरुण आणि मंदार हे दबले गेल्याने त्यांना मात्र बाहेर काढता आले नाही. थोड्या वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनंतर काही धाडसी युवकांनी पोलिसांच्या समक्ष दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.