Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतला बातमी : आमच्याकडे येणारे सगळे साधुसंत नाहीत, आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर : एकनाथ खडसे

Spread the love

भाजपात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या इनकमिंगवर  पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपली  प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ धुवून घेतो. पक्षात आल्यानंतर क्लीन चिट देतो. नंतर ते कामाला लागतात, अशी शेलक्या शब्दात खडसे यांनी टीका केली आहे.

जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल, भाजपात सुरू असलेली मेगाभरती  आणि नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश आदी विषयावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी संवाद साधला. विरोधी पक्षातून भाजपात येणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करून घेतो. पक्षात घेतल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. आमचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स आहे, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे. आमच्याकडे येणारे सगळे साधुसंत नाहीत. काही संधीसाधुही आहेत, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

यावेळी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाच खडसे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, सुरेश जैन यांना शिक्षेसाठी उशीर झाला. त्यांनी नेहमी सत्ताधारी पक्षात जाऊन संरक्षण घेतले. नसता प्रकरणाचा निकाल दोन वर्षात लागला असता. आरोपींना जन्मठेपेची व्हायला हवी होती. त्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, असे खडसे यांनी सांगितले.

खडसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं. त्यांनी यशवंतराव चव्हाणांची साथ सोडून वेगळा पक्ष तयार केला. त्यांनी इतर पक्षांमधल्या अनेकांना आपल्या पक्षात ओढून आणलं. आता तीच परिस्थिती त्यांच्यावरच उलटलीय असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश आणि शिवसेनेची भूमिका याविषयी बोलताना खडसे म्हणाले, नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असे अनेक वर्षांपासून ऐकतोय. कोणाला पक्षात घ्यायचे हा त्या त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेनेचा दबाव घेण्याचे कारण नाही. छगन भुजबळांना घ्यायचे की नाही, हा जसा शिवसेनेचा निर्णय तसेच राणेंना घ्यायचे की नाही हा भाजपाचा निर्णय आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!