Vidarbh : ‘महाजनादेश’ यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंची ‘फडवणीस पोलखोल’ यात्रा

काँग्रेस ‘ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली असून त्यांनी महाजनादेश यात्रेवरून मुख्यमंत्र्यांसह भाजपचा समाचार घेतला आहे. महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी त्यांनी विदर्भात ‘फडवणीस पोलखोल’ यात्रा काढणार असल्याचे म्हटले आहे . विदर्भात जिथे मुख्यमंत्री गेले तिथे जाऊन फडवणीस सरकारने जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली, सांगणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत नाना पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली होती. दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच, अशा शब्दात टोला लगावला होता. मुख्यमंत्री जसा वागतो, तसेच मंत्रिमंडळातील मंत्री वागतात. सेफ बोटमध्ये मंत्री फिरतात, असा ही आरोपा नाना पटोले यांनी केला होता. एका बाजूला राज्यात अस्मानी आणि दुष्काळी संकट तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा करीत आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले होते.
नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच कडवी टीका करून भाजपची साथ सोडली होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका करत नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, मोदी सरकारला शेतकऱ्यांची किंमत नाही’, अशी जाहीर टीका करत नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली होती. मोदी सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातील पहिलं बंड मानलं गेलं.