Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश , न्यूझीलंडवर ११९ धावांनी केली मात

Spread the love

यजमान इंग्लंडने २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. न्यूझीलंडवर ११९ धावांनी मात करत इंग्लंडने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. ३०६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पुरता कोलमडला. इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज फारकाळ तग धरु शकले नाही. मात्र न्यूझीलंडने २०० पेक्षा जास्त धावांनी पराभव टाळत, पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतल्या आशांवर पाणी फिरवलं आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्याच्या निकालावर न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चीत होणार आहे. बांगलादेशचा संघ सामना जिंकल्यास न्यूझीलंडचं स्थान पक्क होईल. पण पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असल्यास त्यांना बांगलादेशला २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरवावं लागणार आहे. मात्र बांगलादेशचा संघ सध्या ज्या पद्धतीने खेळतो आहे ते पाहता पाकिस्तानसमोरचं आव्हान खडतर असेल यात वाद नाही.

न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातच खराब झाली. हेन्री निकोलस भोपळाही न फोडता ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ठराविक अंतराने मार्टीन गप्टीलही जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बटलरकडे झेल देऊन माघारी परतला. कर्णधार केन विल्यमसन, अनुभवी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना केला, मात्र त्यांची झुंज फारकाळ टिकू शकली नाही. न्यूझीलंडचा संघ केवळ १८६ धावांपर्यंत मजल मारु शकला. इंग्लंडकडून मार्क वूडने ३ बळी घेतले. त्याला ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, लियाम प्लंकेट, आदिल रशिद आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावचीत झाले. त्याआधी, सलामीवीर जॉनी बेअरस्टोचं शतक आणि जेसन रॉय-इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३०५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या विकेटसाठी आक्रमक शतकी भागीदारी केल्यानंतर, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. मात्र अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी धावा जमवत संघाला ३०५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. या दोन्ही संघांमधला विजेता संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहे.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना, इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली. जिमी निशमने जेसन रॉयचा अडथळा दूर केला. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी विकेट फेकण्यास सुरुवात केली. जो रुट, जोस बटलर हे भरवशाचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. मात्र कर्णधार इयॉन मॉर्गनने अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना साथीला घेत संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. बेअरस्टोने १०६, जेसन रॉयने ६० तर कर्णधार मॉर्गनने ४२ धावांची खेळी केली.

खराब सुरुवातीनंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामन्यात चांगलं पुनरागमन केलं. एका क्षणाला इंग्लंड ३५० चा पल्ला गाठणार असं वाटत असतानाच, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. ट्रेंट बोल्ट-मॅट हेन्री-जिमी निशम या खेळाडूंनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना मिचेल सँटरन आणि टीम साऊदीने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!