Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आरक्षण : शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठी उभी राहील : उद्धव ठाकरे

Spread the love

कोणत्याही समाजाच्या ताटातील काहीही हिरावून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता कुणीही सुप्रीम कोर्टात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये. या वादात कुणीही रमू नये, असं आवाहन करतानाच या आरक्षणाच्या आड कुणी आलंच तर शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठी उभी राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी स्पष्ट केलं. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे भेट घेतली.

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विरेन पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षण बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर काही लोकांनी सुप्रीम कोर्टात या आरक्षणाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू केल्याचं शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर कुणाचाही हक्क हिरावून घेण्यात आलेला नाही. कुणाच्याही ताटातलं काढून मराठा समाजाला देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाऊ नका. या वादात रमू नका आणि मराठा आरक्षणाला अडसर निर्माण करू नका, असं उद्धव म्हणाले.

मराठा आरक्षणाला विरोध करून मराठा- मराठेत्तर असा वाद निर्माण करू नका. सर्वांनी छत्रपती शिवरायांचे मावळे बनून एकत्र येऊन एकजूट दाखवूया, असं सांगतानाच या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध झालाच तर शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्यापाठी उभी राहील. दिल्लीत जी काही मदत लागेल ती शिवसेना पुरवेल, असं ते म्हणाले. तसेच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची आमची आजही इच्छा आहे. उरलेल्या तीन टक्के आरक्षणाबाबत लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यासारखं आम्हीही काहीही केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!