काँग्रेस नेत्याचा आणखी एक चिरंजीव सेनेच्या प्रेमात , उद्या प्रवेशाची शक्यता

लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक मातब्बर नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतं. लोकसभा निवडणुकीतही असंच चित्र होतं. तर राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षिरसागर यांच्यानंतर नागपूर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुशांत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्य़ाचं सांगण्यात येत आहे.
रविवारी दुपारी ४ वाजता दुशांत चौधरी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दुशांतच्या या शिवसेना प्रवेशावर सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. दुशांत चौधरी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य आहेत.
दुशांत चौधरी नागपूर येथील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा संचालकदेखील आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे नागपूर आणि मुंबईत मिळून एकूण २८ शाळा महाविद्यालये असून यात २ हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर २० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत.