बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला मुलगा पाण्यात बुडाला , परभणी जिल्ह्यातील दुर्घटना

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथील श्रीराम महादेव काष्टे ( वय १२ ) या शाळकरी मुलाचा मंगळवारी (४ जून) दुधना नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुधना प्रकल्पातून तीन दिवसांपूर्वीच नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. नदीला पाणी आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला.पण बेसुमार वाळू उत्खननामुळे पात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत. पाण्याने भरलेले डोह नेमके कुठे आहेत ? हेही ओळखणे कठीण आहे. अशाच एका ठिकाणी श्रीराम बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला असता पाय घसरून तो डोहात बुडाला.
त्याचवेळी काही अंतरावर कपडे धुणार्या शिलाबाई विश्वनाथ काष्टे यांनी त्याला पाण्यात बुडत असतांना पाहिले. गावकर्यांना माहिती समजताच अंकुश सुतार, भगवान काष्टे यांनी श्रीरामाचा मृतदेह डोहातून बाहेर काढला. घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली आहे.