Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World cup : ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर सात विकेटने केली मात

Spread the love

गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर अॅरन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत शनिवारी अफगाणिस्तान संघावर सात विकेटनी मात केली. अफगाणिस्तानने दिलेले २०८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ३४.५ षटकांत ३ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.

ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंडवर रंगलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तथापि, हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर खाते न उघडता बाद झाले. रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचून संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. या दोघांनाही अॅडम झाम्पाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. मंहमद नबी धावबाद झाला. एकविसाव्या षटकामध्ये अफगाणिस्तानचा निम्मा संघ ७७ धावांमध्ये माघारी परतला होता.

कर्णधार गुलबदिन नायब आणि नजीबुल्ला झाद्रान यांनी सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचून संघाला दीडशेपार पोहचवले. नजीबुल्लाने ४९ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. नायबने ३१ धावा फटकावल्या. मार्कस स्टॉइनिसने चौतिसाव्या षटकामध्ये या दोघांनाही बाद केले. त्यानंतर, तळातील रशीद खानने दोन चौकार व ३ षटकारांसह २७ धावा फटकावून अफगाणिस्तानला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच-वॉर्नरने ९६ धावांची सलामी दिली. फिंचने ४९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. ख्वाजा बाद झाल्यानंतर वॉर्नरने स्मिथच्या साथीने ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप आणून पोहोचवले. विजयासाठी तीन धावांची गरज असताना स्मिथ बाद झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉर्नरने ११४ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ८९ धावा केल्या.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!