Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींची जात मला माहित नाही , आम्ही व्यक्तिगत पातळीवरचं आणि जातीचं राजकारण करीत नाही : प्रियांका गांधी

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीवरून केलेल्या विधानाने ठिणगी पडली असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधानांवर निशाणा साधला. ‘पंतप्रधानांची जात कोणती हे मला आजतगायत माहीत नाही. मला वाटतं विरोधी पक्षाने असलं राजकारण कधीच केलं नाही’, अशा शब्दांत प्रियांका यांनी टीकास्त्र सोडलं.

विरोधी पक्ष, त्यातही काँग्रेसचे नेते नेहमीच प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर बोलत आले आहेत. आम्ही कधीच कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही, असेही प्रियांका यांनी नमूद केले. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरूनही प्रियांका यांनी मोदींना टोला लगावला. जनतेचा आदर करणे, त्यांच्या समस्या सोडवणे हाच सर्वात मोठा राष्ट्रवाद असून काही लोक मात्र जनतेचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. याला लोकशाही म्हणता येणार नाही आणि हा राष्ट्रवाद तर मूळीच नाही, असे प्रियांका यांनी सुनावले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील कनौज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जातीचा मुद्दा पुढे करत सपा-बसपासह सर्वच विरोधी पक्षांवर तोफ डागली होती. ‘मोदी स्वत:च्या स्वार्थासाठी आपली मागास जात सांगत सुटले आहेत’, या मायावतींच्या विधानाचा मोदींनी समाचार घेतला होता. ‘माझी जात इतकी लहान आहे की, गावात आमचं एखाद-दुसरं घरही सापडत नाही. मी मागास जातीत नाही तर अतिमागास जातीत जन्मलो आहे. हे बोलण्यास मला तुम्हीच भाग पाडत आहात’, असे मोदी म्हणाले होते. त्यावरून आधी मायावती , राजद नेते तेजस्वी यादव आणि आता प्रियांका गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!