एकमेकांना बोलणेच कळेना : मूकबधिरांच्या मोर्चावर लाठीचार्ज ,

विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन आलेल्या मूकबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचे वृत्त असून या लाठीचार्जमध्ये काही मूकबधीर विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे . महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, पोलिसांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थी बेफाम झाले होते, त्यांना आवरण्याचा प्रयत्न केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या मूकबधीर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहेत. अजूनही आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला नसून सौम्य बळाचा वापर केल्याचे म्हटले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात प्रयत्न केला. पण ते काय सांगत आहेत, ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना समजत नव्हते. आंदोलकातील एकाने इतरांना इशारा करून पोलिसांवर चालून जाण्यास सांगितले. अचानक दीड ते दोन हजार आंदोलक पुढे आले. त्यामुळे थोडे तणावाचे वातावरण बनले. त्यानंतर लाठीचार्ज करावा लागल्याचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले.
आंदोलक मूकबधीर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सरकारने त्वरीत पावले उचलली नाहीत तर मुंबईला चालत जाऊन मोर्चा काढण्याचे आंदोलकांनी ठरवले आहे. मूकबधिरांना शिक्षण, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी मोबाइलवरून चर्चा केली. आंदोलक आणि राज्यमंत्री कांबळे यांच्यात तस्लिम शेख यांनी संवाद साधला. कांबळे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलकांमधील ५ जणांनी मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, जोवर मागण्या मान्य होत नाही. तोवर आम्ही याच ठिकाणी ठिय्या मांडणार, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये १)शेख शकील शेख साबीर, (वय-३१,रा.दर्गा मोहल्ला, वसमत), २) प्रशांत धुमाळे (वय २४, रा. देगलूर, नांदेड), ३) सिद्धनाथ लष्करे (वय २३, रा. लातूर), ४) कोंडिबा खरात (वय ३४, मानखुर्द, मुंबई), ५) किरण राजपूत (वय ४२, रा. नवापूर, नंदूरबार), ६) दिलीप गट (वय ३०, रा. पारनेर, अहमदनगर), ७) प्रमोद सुर्वे (वय ४०, रा. शिरगाव, सांगली), ८) हनिफ खारियत (वय ३२, दोंडाईचा, धुळे), ९) अमित कुमार सिंह (वय २९, देहूरोड, पुणे), १०) बाबू शेख (वय ५२, रा. देहूरोड, गांधीनगर), ११) नागेश भंडारे (वय ३४, रा. मालेगाव), १२) कृष्णा शिवाजी कदम (वय १९) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत.