विद्या बालनचा साजिद खानसोबत काम न करण्याचा निर्धार

लैंगिक शोषणाचे आरोप झालेला दिग्दर्शक साजिद खान याला आणखी एक धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिनं साजिद खानसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. साजिद महिलांशी नीट वागत नसल्यामुळं हा निर्णय घेतल्याचंही विद्यानं स्पष्ट केलं आहे. साजिद खाननं दिग्दर्शित केलेल्या ‘हे बेबी’ या चित्रपटात विद्या बालननं काम केलं होतं. त्यानंतर दोघांनी कधीच सोबत काम केलं नाही. ‘साजिद खान महिलांना समजून घेऊ शकत नाही. महिलांशी कसं वागावं हे त्याला कळत नाही. म्हणून मी त्याच्यासोबत काम करणार नाही’ असं विद्यानं म्हटलं आहे. साजिद खानवर दोन तरुणींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. साजिदने हे आरोप फेटाळले असले तरी त्याला याचा फटका बसला आहे. ‘हाउसफुल ४’सह अनेक चित्रपटाचं काम त्याच्याकडून काढून घेण्यात आलं आहे.