महापुरुषांची विभागणी करू नका : श्रीपाल सबनीस

महापुरुषांच्या विचाराने लोक एकत्र येतात, मात्र हा माझा महापुरुष आणि तो तुझा महापुरुष अशी विभागणी करून त्या दोन महापुरुषांनाच एकमेकांच्या विरोधात उभे लढविण्याचे प्रयत्न देशात सुरू आहेत. यात देशाचे भविष्य नाही. दोन महापुरुषांची बेरीज करूनच समाज अधिक प्रगल्भ होईल, असा विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग आणि डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणारे प्रा. डॉ. प्रदीप आगलावे यांचा त्यांच्या विद्यार्थ्यांनी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, माजी मंत्री नितीन राऊत, डॉ. शांतिस्वरूप बौद्ध, डॉ. सरोज आगलावे आदी उपस्थित होते. डॉ. आगलावे यांच्यावरील ‘प्रदीप्त प्रज्ञा’ हा गौरव ग्रंथही यावेळी प्रकाशित करण्यात आला. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला संवाद होता की संघर्ष याच्या खोलात अद्याप आपण पोहोचलो नाही. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांना एकमेकांशी लढवायला नको. जातीच्या नावावर संघटना उभ्या करून संविधानातील मूल्यांचा ऱ्हास करीत असल्याची खंत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्यासोबत झालेल्या वादाचा उल्लेख केला. मात्र अलीकडे मांडलेल्या विचारांचे डॉ. साळुंखे यांनी स्वागत केले असल्याचेही डॉ. सबनीस यांनी सांगितले. डॉ. साळुंखे यांनीही या वादावर वक्तव्य करत मतभेद आजही असल्याचे सांगितले, मात्र आमच्यात वैर नाही असे सांगून अखिल भारतीय साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांनी मांडलेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.
डॉ. आगलावे
संविधान विरोधी समाज निर्माण करण्याचे काम देशात सुरू आहे. जाती-धर्मांच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे. लोकशाही प्रधान समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. हा देश धोक्याच्या वळणावर असून विचारांना अपंग बनवू नका असे आवाहन डॉ. प्रदीप आगलावे यांनी यावेळी केले. आपल्या आयुष्याबाबत सांगत असताना डॉ. आगलावे यांनी गांधी आश्रमात घालविलेल्या दिवसांतील आठवणी सांगितल्या. खादीचे कपडे घालत असलो तरी विचार आंबेडकरी होते असे डॉ. आगलावे म्हणाले.