नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत दोन ट्रॅक्टरची जाळपोळ

छत्तीसगडच्या राजनांदगावपासून चंद्रपूरपर्यंत ७६५के. व्ही. उच्च दाब वाहिनीच्या टॉवर उभारण्याचे काम सुरु आहे. या कामावरील कोरची तालुक्यातील मसेली,मयघाट, आंबेखारी परिसरात दोन ट्रॅक्टर व टॉवरच्या तार ओढण्याच्या तीन मशीन माओवाद्यांनी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. वाहन आणि मशीन जळाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
कोरची तालुक्यात मसेली ते मयघाट आंबेखारी दरम्यान ७६५ के.व्ही.च्या उच्च दाब वाहिनीचे टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. ही लाईन रायपूर ते राजनांदगाव गडचिरोलीपासून चंद्रपूरपर्यंत नेण्यात आली आहे. या भागात काम सुरु असताना सशस्त्र माओवादी तिथे आले. त्यानी या कामावरील मजुरांना एका ठिकाणी बोलवून धमकावले. त्यानंतर दोन ट्रॅक्टरसह वायर ओढण्याच्या कामासाठी असलेल्या तीन महागड्या मशीन पेटवून दिल्या. एका मशीनची किंमत चाळीस लाख रुपये आहे. या जाळपोळीच्या घटनेतून एक कोटीपेक्षा जास्त नुकसान माओवाद्यांनी केले आहे. तसेच सहा वाकीटाकी माओवाद्यांनी नेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून आदिवासीचे हत्यासत्र सुरू आहे. आता जाळपोळीच्या घटनेमुळे पुन्हा दहशत निर्माण केली आहे.