जन्मदात्याकडून दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
बापाच्या नात्याला काळिमा; मुलांवर जन्मदात्याकडून अनैसर्गिक कृत्य
जन्मदात्या बापाने मागील सहा महिन्यांपासून पोटच्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. बापाने वारंवार केलेल्या अतिप्रसंगाला कंटाळून दोन्ही मुलांनी पोलीस ठाणे गाठले आणि मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ढोकी (जि. उस्मानाबाद) पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ढोकी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका गावात आरोपीने अत्याचार केल्याची तक्रार मुलांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. यापूर्वीही या मुलांवर अत्याचार होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अत्याचाराला कंटाळून एक मुलगा घरातून पळून गेला. असा प्रकार तीन वेळा घडला. तीनही वेळा मुलाला पोलिसांकडून वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मागील सहा महिन्यांपासून वडिलांकडून होत असलेल्या अतिप्रसंगाची कहाणी त्याने विशद केली होती.