Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काँग्रेसच्या कार्य समितीची वादळी बैठक , सहा महिन्यात ठरणार काँग्रेसचा अध्यक्ष

Spread the love

काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांना पक्षातील ज्येष्ठ २३  नेत्यांनी दोन आठवड्यापूर्वी लिहिलेल्या पत्रानंतर झालेली काँग्रेसची  बैठक वादळी ठरली. तब्ब्ल सात तास चाललेल्या या बैठकीत नवीन अध्यक्षांच्या निवडीसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली. अखेर चर्चेअंती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी राहणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढील सहा महिन्यात नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाणार असून, तोपर्यंत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व निवड करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोमवारी काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सुरूवातीलाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पद सोडण्यास तयार असल्याचं सांगत जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती कार्यसमितीकडे केली. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिलेल्या पत्राच्या वेळेवरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत नेत्यांना सुनावलं आणि सावरूनही घेतलं. त्याचबरोबर हे पत्र भाजपाला पूरक असल्याचा आरोपही बैठकीत झाला. त्यावरून दुपारी बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी तर या विषयावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र सोनिया गांधी यांच्या भाषणानंतर सर्वच नेत्यांची नाराजी दूर झाली असल्याचे वृत्त आहे. बैठकीच्या समारोपात बोलताना सोनिया गांधी यांनी पत्रावरून आणि झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून नाराजी व्यक्त केली. “आपण दुखावलो गेलो आहे, पण सगळे माझे सहकारीच आहे. झाले गेलं सोडून द्या. आता पुन्हा एकदा नव्यानं एकजुटीनं कामाला सुरूवात करू,” अशा भावना सोनिया गांधी यांनी बैठकीत व्यक्त केल्या.

 

या बैठकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आनंद शर्मांवर पत्र लिहिल्याचा आरोप करत खेद व्यक्त केला. या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍यांमध्ये गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.  या बैठकीत सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसंच येत्या ४ ते ६ महिन्यांत अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसने सदस्यता अभियानही सुरू करावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हे पत्र दुर्दैवी असल्याचं म्हटलं. तर ए. के. अँन्टोनी यांनी हे पत्र क्रूर असल्याचं भाष्य केलं. दरम्यान पत्र लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंबिका सोनी यांनी केली. ज्या कुणी शिस्तभंग केला आहे त्याच्यावर पक्षाच्या घटनेनुसार कारवाई केली जावी, असं सोनी म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!