Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : पुन्हा अवतरले मंगळसूत्र चोर , गजबजलेल्या चौकात मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी लांबवीले मंगळसूत्र

Spread the love

मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून नातेवाईकांना भेटून घराच्या दिशेने निघालेल्या एका ४० वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची खळबळजनक घटना आज गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गजबजलेल्या अमरप्रीत चौकाजवळ घडली. चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या चोरट्यांनी समर्थनगरातील एका महिलेचे मंगळसूत्रही हिसकावलेले आहे.

बसैयेनगरातील अर्चना शीतल मुंदडा (४०) या कामानिमित्त जालना रोडवरील अमरप्रीत हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. नातेवाईकांना भेटून त्या पायी घराच्या दिशेने जाण्यासाठी अमरप्रीत चौकाच्या दिशेने जात असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड केली, तोपर्यंत चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली होती. घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचे कळताच क्रांतीचौक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकानेदेखील घटनास्थळी धाव घेतली. मंगळसूत्र हिसकावणारे दोघे दुचाकीस्वार चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यातील दुचाकी चालविणाऱ्याच्या अंगात पांढरा शर्ट तर पाठीमागे बसलेल्या चोरट्याचा अंगात काळे जॅकेट असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांचा चेहराही स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी समर्थनगरातून महिलेच्या अंगावरील दागिने हिसकावल्याच्या फुटेजमध्येदेखील हेच चोरटे असल्याचे दिसून येत असल्याचेदेखील सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सांगितले.

वर्षभरात मंगळसूत्र चोरीचे अर्धशतक
चोरी, घरफोडी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी आयुक्तांनी गुन्हे शाखेची ४० पथके तैनात केली होती. पथकांपाठोपाठ संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचीदेखील गस्त लावण्यात आली होती. असा प्रचंड फौजफाटा तैनात असतानासुद्धा चोरटे डाव साधत आहेत. चोरट्यांनी सिडको, साईनगरातील अंजली अष्टीकर, जवाहर कॉलनी, आदर्श कॉलनीतील नंदा सुधाकर मुळे यांसह नागेश्वरवाडीतील ७० वर्षीय महिला, गारखेडा, उत्तमनगरातील अनिता त्र्यंबक देशमुख, भानुदासनगरातील तनुजा विपुलचंद कंदी, टिळकनगरातील ज्योती नारायण देसाई या वृद्ध महिलेसह शहरातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल ५० महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली. मात्र, एकही मोठे रॅकेट पकडण्यात अद्याप तरी पोलिसांना यश आले नाही, हे विशेष.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!