Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : पुन्हा अफवा आणि चर्चांचा दिवस , मोदी-पवारांची भेट , सेनेच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली तर सोनियांचे “नो कॉमेंट !”

Spread the love

आज दुपारपर्यंत महाराष्ट्राविषयीच्या चर्चा आणि अफवा दिल्लीत चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. एकत्रित सगळे सांगायचे झाले तर सकाळची नेहमीप्रमाणे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एक डिसेंबरपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे पवारांनीही स्वतः सेनेशी चालू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात असून सत्ता स्थापनेचा गुंता येत्या दोन दिवसात सुटेल असे पहिल्यांदा प्रतिपादन केले आहे. दुसरीकडे त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर चर्चा सुरु झाल्या कि , केंद्रीय आणि राज्याच्या सत्तेत महत्वाचे स्थान आणि २०२२ मध्ये राष्ट्रपतीपद या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाण्याची शक्यता आहे . पवारांनी मात्र मोदींशी आपली कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या समस्यांवर आपण मोदींशी चर्चा केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजप सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे.

या सर्व बातम्या काय आहेत ते आपण पाहुयात…

काँग्रेसच्या बैठकीत काय झाले ? महाराष्ट्राच्या बाबतीत त्या म्हणाल्या ‘नो कमेंट्स

काँग्रेसने आज संसदेतील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी खासदारांची बैठक घेतली . काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिय गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि काश्मीरमधील स्थानिक नेत्यांची नजरकैद आदी मुद्यांवरून संसदेत सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. याचबरोबर काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरून राज्यसभेत जोरादार चर्चा झाली. येथील सद्य स्थितीस असलेल्या परिस्थितीवरून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. तर गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तापेचावर मात्र मौन बाळगलं आहे. संसदेत पत्रकारांनी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील सत्तापेचावर विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘नो कमेंट्स’ इतकंच उत्तर त्यांनी दिलं.

शरद पवारांना भाजपची मोठी ऑफर 

दरम्यान महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे जाऊ नये, यासाठी भाजपचे दिल्लीतील नेतृत्व सक्रिय झाल्याचे समजते. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत असून सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत, तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्यूला मांडला असून त्यानुसार, जुलै २०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद आणि राज्यातील सत्तेत मोठा वाटा देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यां नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून जवळपास ४५ मिनिटं ही बैठक सुरु होती. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची नरेंद्र मोदी यांना दिली असून लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना राज्यपालांनी जाहीर केलेली आठ हजार कोटींची मदत अपुरी असून अद्याप ती मिळाली नसल्याचं सांगितलं. हेक्टरी किमान ३० हजारांची मदत दिली जावी अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. तसंच २०१२-१३ ला आम्ही हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत दिली होती अशी माहिती त्यांनी नरेंद्र मोदींना दिली.

भाजपची महाराष्ट्रातील घडामोडींवर नजर 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त सत्ता स्थापण्याचा प्रयत्न असताना, भाजपचे नेतेही सर्व घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहेत. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा ठाम विश्वास भाजपच्या गोटात व्यक्त केला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे आधीच शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन होणे कठीण असून, भाजपशी जुळवून घेण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नसेल, असाही सूर भाजपमध्ये आहे. त्यादृष्टीने डावपेच आखले जात असल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेला मात्र सत्ता स्थापनेचा विश्वास 

दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून लवकरच सरकार स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला आहे. “शरद पवार आणि आमच्या युतीबद्दल चिंता करु नका, लवकरच शिवसेनेच्या नेतृत्त्वातील संयुक्त सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, एक स्थिर सरकार असेल,” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे,

‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या दुपारपर्यंत बहुतेक चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरआधी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल,’असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!