Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मुख्यमंत्री , अजित पवार आज अखेरच्या दिवशी भरणार अर्ज , जाणून घ्या किती दाखल झाले अर्ज ?

Spread the love

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज आज अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, अद्याप ज्या नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही ते अखेरच्या क्षणापर्यंत प्रतीक्षेत आहेत. यापैकी काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. दरम्यान भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलेले विनोद तावडे मुंबईतील पक्ष कार्यालयात थोड्याच वेळात पत्रकारांशी बोलणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नागपुरात असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची चर्चा चालू आहे. बावनकुळे यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा होत असल्याचे वृत्त असून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची धावपळ सुरु आहे.

सेना-भाजपची आज संयुक्त पत्रकार परिषद; महायुतीची अधिकृत घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना आणि भाजप पक्षाची पहिली संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत संपन्न होणार आहे. याअगोदर तीन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक जारी करुन शिवसेना आणि भाजपची युती जाहीर केली होती. त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न होणार असून त्यात अधिकृतपणे युतीची घोषणा होणार आहे. या पत्रकार परिषदेत अनेक जागा वाटप आणि निवडणुकीशी संबंधित अनेक बाबींविषयी माहिती दोन्ही पक्षांकडून देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्या संदर्भातही या परिषदेत माहिती दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आतापर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांची  नामनिर्देशनपत्रे दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी आज, गुरुवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आतापर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, शुक्रवार, ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!