लालकृष्ण आडवाणी यांच्या यशाचे अमित शहाच असायचे शिल्पकार : प्रकाश जावडेकर

Spread the love

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आडवाणींऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाचं जोरदार समर्थन करताना ‘आडवाणी यांच्या प्रत्येक विजयामागे अमित शहाच होते’, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
याचे अधिक स्पष्टीकरण देताना प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे कि , ‘लालकृष्ण आडवाणी पक्षाच्या प्रचारासाठी देशभर दौरे करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची सारी दारो – मदार अमित शहा यांच्यावरच  असायची. आडवाणींच्या मतदारसंघाचं प्रभारीपद शहा यांच्याकडेच होतं. ही जबाबदारी प्रत्येकवेळी चोखपणे पार पाडत शहा यांनी आडवाणींचा विजय सुकर केला’, असे जावडेकर यांनी नमूद केले.

शहा यांचा निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात हातखंडा असल्याचेही जावडेकर यांनी पुढे सांगितले. त्यामुळे अमित शहा हेच अडवाणींच्या विजयाचे खरे शिल्पकार होते असेच जावडेकर यांनी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे . दरम्यान, ९१ वर्षीय लालकृष्ण आडवाणी १९९८ पासून गांधीनगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून यावेळी मात्र त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. या मतदारसंघातून अमित शहा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आडवाणी यांच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा रंगू लागली असताना पक्षाचा निर्णय कसा योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न जावडेकर यांनी केला असल्याने या विषयावरची चर्चा अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र आहे.

आपलं सरकार