ParliamentNewsUpdate : मोदी , शहा यांनी संसदेतील गोंधळावर बोलण्याची मागणी करीत विरोधक झाले आक्रमक , लोकसभा , राज्यसभा ठप्प…

नवी दिल्ली : संसदेत झालेल्या गोंधळावर सरकारने उत्तर द्यावे या मुद्यावर पंतप्रधान , गृहमंत्री का बोलत नाहीत यावरून विरोधकांनी आज सलग दिवशीही आपला आवाज कायम ठेवला. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही त्यामुळे दिवसभरासाठी दोन्हीही सभागृहे तहकूब करण्याची वेळ सरकारवर आली. यावेळी विरोधी पक्षांने गृहमंत्री अमित शाह यांनी बोलण्याची आणि चर्चेची मागणी केली.
दरम्यान घुसखोरी करणारे दोन तरुण भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रताप सिम्हा यांच्या ‘पास’वरुन संसदेत घुसले होते. त्यामुळे काही विरोधी नेते सिम्हा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
यावर बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या या गंभीर प्रश्नावर आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. संसद आणि खासदारांच्या सुरक्षेबाबत केलेल्या गंभीर त्रुटींबद्दल विरोधी पक्षाच्या खासदारांना बेकायदेशीरपणे निलंबित करणे हा कोणता न्याय आहे? देशाचे गृहमंत्री टीव्हीवर मुलाखती देऊ शकतात, पण संसदेच्या पटलावर बोलू शकत नाहीत. अमित शाह यांनी संसदेत या मुद्द्यावर बोलावे आणि त्यानंतर दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे.
दरम्यान विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देताना, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर विरोधक सभागृहाचे कामकाज थांबवण्याचे निमित्त शोधत आहेत. सभागृहाच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यांच्या सूचना घेतल्या आणि (सुरक्षेत) सुधारणा करण्याचे आश्वासनही दिले आहे. विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय,अशी टीका त्यांनी केली.
गुरुवारी संसदेत मोठा गदारोळ झाला. यामुळे लोकसभेच्या १३ आणि राज्यसभेच्या एका खासदाराला हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. याविरोधात आज संसदेच्या संकुलात विरोधी पक्षांनी निदर्शने केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही यात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, लोकसभेतून काँग्रेसचे व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद, मणिकम टागोर, टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे, डीएमकेच्या कनिमोझी, सीपीआय(एम)चे एस व्यंकटेशन आणि पीआर नटराजन आणि सीपीआयचे के. सुब्बारायन यांना निलंबित करण्यात आले आहे.