AurangabadNewsUpdate : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण : प्रचंड असंतोषामुळे अखेर विद्यापीठाने बदलली निमंत्रण पत्रिका…

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या परिसरात होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या पत्रिकेत विद्यापीठ प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे न टाकल्यामुळे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. अखेर या असंतोषाची दाखल घेऊन विद्यापीठाने तत्काळ नवीन निमंत्रण पत्रिका छापून त्या वितरित केल्यामुळे हि नाराजी सध्या तरी दूर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे.
या पत्रिकेत शिवसेनेचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव डावलण्यात आले होते. विशेष म्हणजे भाजपच्या सर्व मंत्र्यांच्या नावांचा उल्लेख होता. त्यामुळे दानवे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने तुकाराम सराफ यांनी आपली नाराजी कुलगुरूंना कळवली होती.
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
या सर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया देताना दानवे यांनी म्हटले आहे कि , “मला कार्यक्रमाचं निमंत्रण आहे, परंतु निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. मला वाटते कुलगुरुंना अडचण वाटली असेल किंवा सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करायचे असेल म्हणून हे केले असेल. पण मी वैधानिक मार्गाने कुलगुरुंविरोधात आजच हक्कभंग मांडणार आहे. राजशिष्टाचारानुसार सर्वच लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेच पाहिजे. मी कार्यक्रमाला जाणार नाही. माझे पूर्वनियोजित कामे असल्याने बुलढाण्याला निघालेलो आहे. पुढील दोन दिवसात सर्व शिवसैनिकांना घेऊन धूमधडाक्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन करेन.”
खा. इम्तियाज जलील यांनाही नव्हते निमंत्रण…
एम आय एम चे विद्यार्थी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाचे निमंत्रण खा. इम्तियाज जलील यांनाही निमंत्रण नव्हते . त्यामूळे आज कुलगुरू यांना भेटुन निषेध व्यक्त केला. यावेळीत्यांच्यासमवेत शहर अध्यक्ष शारेक नक्षबंदी , मझर पठाण पक्षाचे विद्यार्थी युवक आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते . त्यामुळे आज कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कार्यक्रम पत्रिका बदलली आणि नवीन पत्रिकेत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले , खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांची नावे वाढवण्यात आली.
बॅनरबाजीवरूनही वाद , अखेर सर्व बॅनर हटविले …
दरम्यान या कार्यक्रमानिमित्त विविध राजकीय नेत्यांनी विद्यापीठ परिसरात आपापले बॅनर लावले होते त्यावरून विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली अखेर कुलगुरूंनी परिसरातील सर्व राजकीय नेत्यांचे बॅनर हटविण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आणि हा वाद शांत झाला.
असा आहे शिवरायांचा अश्वारुढ पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा ११ फूट उंच आहे. पंतधातूमध्ये बनवण्यात आलेल्या या पुतळ्याचं वजन सव्वा टन आहे. या पुतळा तयार करण्यासाछी ३५ लाख रुपये खर्च लागला. विद्यापिठाच्या प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा प्रस्ताव माजी कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे यांच्या काळात मंजूर झाला होता. मात्र पुतळ्याची जागा, अंतर्गत विरोध आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यानंतर आज या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.