MumbaiNewsUpdate : समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई : समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले असून त्यांना कोपरी पोलीस स्टेशनमध्ये समीर वानखेडेंना २३ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. नवी मुंबईतील सद्गुरू बार अँण्ड रेस्टॉरंटचा मद्यविक्री परवाना खोट्या माहितीच्या आधारे समीर वानखेडे यांनी मिळवल्याचा आरोप आहे आणि त्याच प्रकरणात कोपरी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. दरम्यान या प्रकरणात मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतल्यानंतर समीर वानखेडे यांना न्यायालयानेही फटकारले आहे. आपली अटक टाळण्यासाठी आणि रद्द केलेल्या देशी -विदेशी दारूच्या परवान्याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलीस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द करण्याच्या आदेशाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार देत समीर वानखेडे यांची याचिका इतक्या त्वरित आमच्यासमोर सुनावणीसाठी आलीच कशी असा सवाल उपस्थित करीत उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
सामान्य नागरिकांची नियमानुसार अनुक्रमाणे सुनावणीसाठी याचिका येते. मग एखादा प्रभावशाली व्यक्ती असेल तर तातड़ीने सुनावणी होणार का? असा सवालही उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या वकिलांना उपस्थित केला. यासोबतच समीर वानखेडे यांनी या प्रकरणात अटकेविरोधातही याचिका दाखल केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षाने उत्तर देण्यास वेळ मागितला आहे.
असे आहे प्रकरण?
उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतल्या वाशी येथे एक बार आहे. या बारसाठी२७ ऑक्टोबर १९९७ रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. हे बार आणि रेस्टॉरंट आहे. वयाच्या १७ व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवल्यानंतर कारवाई केली होती. वाशी येथील सतगुरु हॉटेल्स च्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे काही त्रुटी आढळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच आयएमएफएल (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना समीर वानखेडेंनी म्हटलं होतं की, हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी २००६ मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केला. दरम्यान या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून बारचा परवाना रद्द करण्यात आला.