AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शहरात १६ मे नंतर हेल्मेट सक्ती ; पोलिसांकडून कारवाईचा बडगा

औरंगाबाद : शहरात आजपासून वाहतूक शाखेने दुचाकीस्वार व सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी मंगळवारी जारी केले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी लॉकडाऊन संपल्यानंतर १६ मे नंतर मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे देखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हेल्मेट नसेल तर ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
या आदेशानुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. याबाबत कायदा देखील आहे. शहरात गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आलेली होती. मात्र, त्यानंतर हेल्मेट सक्तीच्या कारवाया होताना दिसत नव्हत्या. दरम्यान, मंगळवारी वाहतूक शाखेच्या वतीने अचानक शहरात हेल्मेट सक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना हेल्मेट किंवा ५०० रुपये सोबत बाळगावे लागणार आहेत.
नागरिकांची पंचाईत…
कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. त्यात आता पोलिसांनी हेल्मेट सक्ती केल्याने ज्यांच्याकडे हेल्मेट नाहीत त्यांना नवीन हेल्मेट खरेदीही करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत होणार आहे.