AurangabadNewsUpdate : लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष ; खा. इम्तियाज जलील यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद : लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष करत मंगळवारी रात्री जंगी मिरवणूक काढून कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या खा. इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या ४० कार्यकर्त्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, विकास एडके, नाईकवाडे उर्फ अज्जू, कार्यकर्ते आरेफ हुसेन, अब्दुल समीर अब्दुल साजेद, शारेक नक्षबंदी, इमरान सालार, इसाक पठाण, अखील सागर आणि मोहम्मद सोहेल यांच्यासह ३० ते ४० जणांचा यात समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ३१ मार्च ते ९ एप्रिल लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला व्यापारी, कामगार, विविध राजकीय पक्ष, संघटना व खा. जलील यांनी विरोध केला होता. जलील हे ३१ मार्च रोजी या निर्णयाविरोधात आंदोलन देखील करणार होते. मात्र, तत्पूर्वी मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन काही काळासाठी लॉकडाऊन स्थगित केल्याची माहिती दिली. राज्य शासनाने काही सूचना केल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन रद्द केल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील यांच्या हडको, एन-१२ येथील घरासमोर येऊन रस्त्यावर सामाजिक अंतर न ठेवता, तोंडाला मास्क न लावता जमाव एकत्र जमवून घोषणाबाजी करत लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष मंगळवारी रात्री पावणेअकरा ते अकराच्या सुमारास साजरा करण्यात आला होता. या मिरवणुकीचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
एकीकडे तोंडाला मास्क लावा असे आवाहन करत दुसरीकडे स्वतः तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टनसिंगचे नियम तोडून जल्लोष केल्यावरून खा. जलील यांच्यावर निटेजन्स कडून सडकून टीका केली जात होती. सामान्यांना दंड आणि राजकारण्यांना सूट अशी टीका होत होती. या प्रकरणावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, बुधवारी सिटीचौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय पवार यांच्या तक्रारीवरुन खासदार जलील व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शेख बाबर करत आहेत.
इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी
दरम्यान औरंगाबाद शहरात कोरोना पसरण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील जबाबदार आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आगपाखड केली. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर खैरेंनी जलील यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जलील यांच्यावर सडकून टीका केली.
“औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही त्यांनी दिला.
“नाचताना शरम वाटायला पाहिजे”
“MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.
या विषयी सिटीचौक पोलिस निरीक्षक संभाजी पवार म्हणाले की, खा जलील यांच्यावर गुन्हा दाखल करुन खा.जलील यांना या प्रकरणी कोर्टात हजर राहण्यास सांगितलं जाण्याची कारवाई केली जातआहे
भाजपचे पोलिसांना निवेदन
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मंगळवारी ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात रात्री आठवाजेनंतर जमावबंदी आदेश लागू आहेत. असे असताना लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष साजरा करणाऱ्या खा. जलील व त्यांच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी दिले होते