सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून करण्यात येणार बदली

गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात कालपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली.
दरम्यान, सचिन वाझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचे निलंबन केले पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. जोपर्यंत सचिन वाझेंचे निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असे दरेकर यांनी म्हटले. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वाझेंना तात्काळ अटक करून, त्यांचे निलंबन करुन, त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेंवर कारवाई करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.