AurangabadCrimeUpdate : सायबर पोलिसांची कारवाई , उद्योजकाला ५६ लाखांना फसवणार्यांना ठोकल्या बेड्या

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे फेक जाहिरातीव्दारे आमिष दाखवून उद्योजकाला ५६ लाखांना गंडविल्याप्रकरणी औरंगाबाद सायबर पोलिसांनी झारखंडच्या दोन व्यापारी भामट्यांना शनिवारी (दि. 31) सायंकाळी अटक केली.
कालु शेख नेश मोहम्मद उर्फ शहाजहान (36, रा. कच्छुवा कोेल, नारेनपुर, राजमहल, साहेबगंज झारखंड, ह.मु चिंचोली रोड ता. सांगोला जि. सोलापुर) व मोहम्मद अहसान रजा मोहम्मद ताहेर अलम उर्फ करिम (28, रा. तोहुर अलम वार्ड, पिअरपुर, साहेबगंज झारखंड, ह.मु पंढरपुर रोड ता. सांगोला जि. सोलापुर) अशी आरोपींची नाव आहेत. आरोपींना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. पुराडउपाध्ये यांनी रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) दिले.
वाळुज औद्योगिक वसाहतीत चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९, रा. सिडको वाळुज महानगर-१, प्लॉट क्र. १०, सिडको कार्यालयाजवळ) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका दैनिकात १ आॅगस्ट २०१९ रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशीत झाली होती. या जाहिरातीव्दारे भामट्यांनी तांदळे यांना सुमारे 56 लाख 64 हजार 700 रुपयांना गंडा घातला. प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सायबर पोलिसांनी तपास करुन वरील दोघा आरोपींना अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता, आरोपींनी साथीदारांच्या मदतीने तांदळे यांची फसवुणक केल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपींच्या साथीदारांना अटक करणे आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा बोकारो झारखंड व पंखरी बरवान बिहार येथुन त्याच्या साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारे अनेक लोकांना गंडा घालत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना देखील अटक करणे आहे.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, सिमकार्ड झारखंड व बिहार येथुन आॅपरेट करित होते. तसेच बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड या विविध राज्यातील बॅंक खाते वापरुन तांदळे यांची फसवणुक केलेली रक्कम वळती केली आहे. आरोपी मोहम्मद अहसान रजा याने झारखंड येथील खात्यावरुन काही रक्कम स्वीकारली तर आरोपी कालु शेख उर्फ शहाजहान याने स्थानिक शेतकर्यांच्या बॅंक खाते मुख्य आरोपीस रक्कम वर्ग करण्या करिता वापरल्याचे देखील तपासात समोर आले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाइल, सिमकार्ड, बॅंक खाती आदीं बाबत तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी न्यायालकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.