JalnaNewsUpdate : जालना शहरात रविवारपासून कडक संचारबंदीचा निर्णय

जालना जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे उस्मानाबादमध्ये प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यूबाबत घोषणा करण्यात आली आहे. जालन्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रविवारपासून जालन्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आहे. जालन्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी तब्बल साडेसहाशेचा टप्पा गाठला आहे, तर आतापर्यंत 21 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान जालनेकर विनाकारण मोठ्या संख्येने बाजारात फिरत असून वाढत्या वर्दळीमुळे कोरोना संसर्गाचं धोका अधिक असल्याने जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात यावी अशी मागणी जालनेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी एक फर्मान काढत नवीन जालना आणि जुना जालनाला जोडणारे सर्व पूल सील केले होते. ज्यामुळे दैनंदिन कामकाजासोबतच जीवनावश्यक सेवेसाठी देखील जालनेकरांना अनेक अडचणी येत आहेत. फक्त पूल जरी सील केले असले तरी बायपासच्या माध्यमातून जालनेकरांची वर्दळ कायमच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत रविवारपासून जालन्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन 7 ते 10 दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून यासंदर्भातील गाईडलाईन्स लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.