AurangabadNewsUpdate : औरंगाबादकर अफवांवर विश्वास ठेवू नका , जिल्हा प्रशासनाचे आवाहन

औरंगाबाद शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणार मेसेज फेक असून नागरिकांनी त्याकडे लक्ष देऊ नये तसेच हे मॅसेज कोणीही फॉरवर्ड करू नयेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. करोना तिसऱ्या स्टेजला आला आहे. त्यामुळे चिकन, मटन बंद राहणार आहेत, येत्या १० तारखेनंतर पूर्ण संचारबंदी लागू होणार असा हा खोटा खोटा मेसेज व्हायरल होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनासमोरची डोकेदुखी वाढली आहे.
औरंगाबाद कलेक्टरकडून सूचना असा फेक मॅसेजचा मजकूर असून त्यात अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आल्याचं म्हटलं आहे. कोरोना लवकरच तिसऱ्या स्टेजला पोहोचेल त्यामुळे सर्वांनीच अतिक्षदक्षता घ्यावी. चिकन, मटन बंद करण्यात आले आहे. शेजाऱ्यांकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कुणाही बरोबर फिरू नका, गरम पाणी गरजेपुरतेच वापरा, ब्रेड, पाव बेकरी सामान बंद, कोणत्याही कामानिमित्त बाहेरील व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये, दूधाच्या पिशव्या बाहेरच धुवून घ्या, वृत्तपत्रे बंद करा किंवा एका ट्रेमध्ये चोवीस तास ठेवून दुसऱ्या दिवशी ही वृत्तपत्रे वाचा, असा निखालस चुकीचा मजकूर असलेले मेसेज सध्या औरंगाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान या आधी हेच मेसेज ठाणे कलेक्टरकडून सूचना या नावाने फिरत होते. अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि खोट्या मेसेजवर विश्वास ठेवून हे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.