AurangabadNewsUpdate : आधी भाऊ गेला , आज आई गेली …. पण डॉक्टरांनी घडविले माणुसकीचे दर्शन… !!

कोरोना काळात मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असताना औरंगाबाद शहरात मात्र MIT कोविड सेंटर मधील डॉक्टरांनी मानवतेचे दर्शन घडविले आहे. त्याचे असे झाले कि, आज कोरोनामुळे घाटी रुग्णालयात एक महिला मरण पावली. मरण पावल्या नंतर संबंधित महिलेचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणे आवश्यक असते त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर प्रशासनाच्या असे लक्षात आले की त्यांचा एक मुलगा हा दोन दिवसांपूर्वीच कोरोनाने मरण पावला. त्यांचा दुसरा मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्यावर एमआयटी कोविड सेंटर येथे उपचार चालू आहेत. ही बातमी डॉक्टरांनी मुलाला सांगितल्यानंतर त्याने प्रशासनाला खूप विनंती केली की कृपया काहीही करून मला माझ्या आईचे अंतिम दर्शन घेऊ द्या.
मात्र तो मुलगाही पॉझिटिव्ह असल्याने त्या मुलाला घाटी हॉस्पिटलला कसे न्यावे ? त्याला त्याच्या आईचे अंतिम दर्शन कसे घडवावे ? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला . सकाळची वेळ असल्याने मनपाच्या सर्व अँब्युलंस इतर Positive पेशंट ला वेगवेगळ्या दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी व्यस्त होत्या. आता नेमके काय करावे ? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला .परंतु कर्तव्य बरोबरच माणुसकी आणि भावनांना महत्त्व देत डॉक्टर रितेश संकलेचा यांनी स्वतः या पॉझिटिव रुग्णाला घाटीत नेण्याची तयारी दाखवली. त्यांनी एम आय टी च्या नोडल ऑफिसर तलत काझी व मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांना माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी त्या मुलाला घाटी येथे नेण्याचे ठरविले .त्यासाठी त्यांनी आवश्यक सर्व काळजी घेतली सर्वात आधी दोघांनीही पीपीई किट परिधान केले. सॅनिटाईझर चा वापर केला. गाडीत दोघे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसून ते घाटी रुग्णालयात पोहचले. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या कर्तव्य सोबतच भावना महत्वाच्या आहेत हा विचार करून डॉक्टरांनी ही मनाचा मोठेपणा दाखवला व स्वतः जबाबदारी घेतली आणि या मुलाला त्याच्या आई पर्यंत नेऊन सोडले. मुलाने आईचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर जवळपास दीड ते दोन तास मध्ये दोघेही थांबले.
पीपीई किट असल्याने दोघेही घामाने ओलेचिंब झाले असतानाही अशा परिस्थितीत त्यांनी तिथे थांबून त्या व्यक्तीला सहकार्य केले आणि त्यानंतर त्यांचे नातेवाईक आल्यानंतर तिथुन पुन्हा त्या रुग्णाला घेऊन आपल्या गाडीतून हॉस्पिटल येथे आणून सोडले. खरोखरच हा प्रसंग म्हणजे मानवतेचे दर्शन घडविणारा आहे. केवळ या डॉक्टरांच्या सकारात्मक विचारामुळेच त्या मुलाला आपल्या आईचे अंतिम दर्शन घेता आले. नाही तर त्याच्या मनात आयुष्यभर या गोष्टीची सल राहून गेली असती. खरोखरच प्रत्येकाने कोरोना रुग्णांकडे बघतांना सकारात्मकता दाखविल्यास त्याचा चांगला परिणाम समाजमनावर होईल, अशी माहिती सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली