बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्याचा दुकानसमोर आत्महत्येचा प्रयत्न

बियाणे पेरल्यानंतरही पिकं उगवत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. अशाच एका तक्रारीवरून सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे संतप्त झालेल्या एका वृद्ध शेतकर्याने संबंधित बियाणे विक्रेत्याच्या दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यातील नांदुर घाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. प्रसंगावधान साधून दुसऱ्या शेतकर्याने रोखले म्हणून अनर्थ टळला.
खरीप हंगामाचा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. जिल्ह्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पण बियाणे उगवून आले नाही. त्यामुळे नव्याने दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खतं आणावे कोठून असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थितीत केला. बियाणे का उगावले नाही, याचा जाब विचारण्यासाठी लालासाहेब दादाराव तांदळे दुकानावर आले होते. त्यावेळी तांदळे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड यांनी प्रसंगावधान साधून अंगावर पाणी टाकले. गावातील दोनशे शेतकऱ्यांच्या बाबतीत सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचे उघड झाले आहे.