सुशांत राजपूत ची आत्महत्या… : बांद्र्यात स्वतःच्या घरात घेतला अखेरचा श्वास…

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ने बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. तो ३४ वर्षांचा होता. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, काल रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. आज सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे वृत्त आहे.
सुशांत सिंग राजपूत ने आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली. २००८मध्ये त्याने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केले. मात्र त्याला खरी ओळख २००९मधिल एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘काय पो छे’ हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. यानंतर सुशांतने वाणी कपूर आणि परिणीती चोप्रासोबत ‘शुद्ध देसी रोमांस’ सिनेमात काम केले. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून झाली. तसेच हा त्याच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सुशांत ने “पी.के”, डिटेक्टिव ब्योमकेस बक्सि, सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही काम केले आहे. सारा अली खानसोबतच्या ‘केदारनाथ’ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.