#AurangabadNewsUpdate : पँथरनेते माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांची प्रकृती चांगली

पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्याची प्रकृती बारी नसल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीची विचारणा करणारे फोन महानायक ऑनलाईनला आले होते. याबाबत त्यांच्या कटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर ते सुखरूप आहेत असे कळविण्यात आले. दरम्यान यांचे निधन झाले असल्याची माहिती सोमवारी (दि.१८) सकाळी सोशल मिडियावर पसरली होती. तपासाअंती ही अफवा असल्याचे समोर आले. माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्या मृत्यूची अफवा पसरविणा-या तीन जणांविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांची प्रकृती खराब असल्याने गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी सकाळी बाबासाहेब साळवे नावाच्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून सोशल मिडियावर माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन झाल्याची माहिती प्रसारीत केली होती. त्यानंतर सिध्दार्थ आठवले व विकास आमराव यांनी कोणतीही शाहनिशा न करता ही माहिती इतर ग्रुपवर शेअर केली होती. हा प्रकार पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव नवतुरे, जिल्हा सचिव मधुकर नगराळे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर खरात यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्या मृत्यूची अफवा पसरविणा-या तिघांविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.