AurangabadNewsUpdate : देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स, वायफायच्या राऊटरसह २ लाख ४० हजाराचा ऐवज लंपास…

औरंंंगाबाद : पडेगाव परिसरातील रावरसपूरा येथे असलेले देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी २ लाख ३९ हजार ८०० रूपये किमतीचे १४९ दारूचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स आदी ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडल्याची घटना २० मार्च ते २० एप्रिल २०२० या काळात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र शालीग्राम जैस्वाल (वय ४५, रा.सिडको, एन-३) यांचे पडेगाव परिसरातील रावरसपूरा येथे देशी दारूचे दुकान आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जैस्वाल यांचे दुकान गेल्या महिनाभरापासून बंद आहे. जैस्वाल यांचे दुकान बंद असल्याची संधी साधुन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील ३ लाख ३९ हजार ८०० रूपये किमतीचे १४९ दारूचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स, वायफायचे राऊटर असा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी जितेंद्र जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक ठोकळ करीत आहेत.
दारु दुकान फोडण्याचे प्रमाण वाढले…..
देशभरात लॉकडाऊन झाल्यापासून दारुच्या दुकाना फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही परिसरांमध्ये दारुची दुकाने आणि बियरबार फोडून चोरांनी लाखो रुपयांची दारु चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय विदेशी व देशी दारुच्या दुकाना बंद असल्याने गावठी दारुची अवैधरित्या विक्री वाढली आहे. या गावठी दारुमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून वारंवार गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाई सुरूच आहे.