#CoronaAurangabadNewsUpdate : औरंगाबादेत आणखी दोन पॉझिटिव्ह , एकूण रुग्णांची संख्या २० वर…

औरंगाबाद: शहरात आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २० वर. शहरातील २९ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) काळ ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ जणांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्याने घरातच विलगिकरणात राहण्याचा सल्ला त्यांना दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच नवीन ५७ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले.एकूण ५७ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी येथे पाठविलेले आहेत. काल आणि आजचे मिळून ४२ जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तेथील ७२ तपासणी अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या एकूण १५ कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४२ रुग्णांना त्यांच्यावर पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. आज रात्री उशिरा आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातीळ एक २९ वर्षीय व्यक्ती यादव नगर येथील असून दुसरी ४० वर्षीय व्यक्ती सातारा परिसरातील आहे. या शिवाय एकही रुग्ण नसलेल्या धुळे जिल्ह्यात दोन रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एका व्यक्तीचे निधन झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या व्यक्तीवर उपचार करण्यात येत आहेत.