Aurangabad crime : पोलिसांवर हल्ला करणारे पाचही जण पोलिसांच्या ताब्यात, चौघांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

औरंंंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात नाकाबंदी करीत असलेल्या पोलिस कर्मचा-यांवर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यापैकी चौघांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.मांजरेकर यांनी शुक्रवारी (दि.१०) दिले.
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, जमादार जनार्दन जाधव, दैनसिंग जोनवाल, सोहेल जफर शेख, राहुल नागलोत, राजेंद्र खरात, महिला पोलिस कर्मचारी परवीन बशीर शेख, सोनी जाधव आदी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाकाबंदी करीत होते. त्यावेळी शेख शाहरूख शेख फारूख (वय २४), शेख फारूख शेख कादर (वय ५३), शेख साजेद उर्फ आशु शेख फारूख (वय २३) सर्व रा. रोजाबाग ईदगाह जवळ, शेख समीर शेख सलीम (वय ३०, रा. नागापुर, ता.कन्नड, ह.मु.बायजीपुरा) व एक १४ वर्षाचा विधीसंघर्षग्रस्त हे दोन दुचाकीवर चौकात आले. व त्यांनी नाकाबंदी करणा-या पोलिसांना शिवीगाळ पोलिसांच्या हातातील लाठी हिसकावून घेत पोलिसांवर हल्ला केला होता.
पोलिसांवर केलेल्या हल्यात दैनसिंग जोनवाल व जनार्दन जाधव हे दोन्ही वाहतूक शाखेचे कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पोलिसांवर हल्ला करणा-या पाचही आरोपींना ताब्यात घेतले होते. पाचही जणांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने चौघांना १३ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी पोलिसांवर हल्ला करणा-यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.