विजेच्या खांबावर कार आदळून ४ जण जागीच ठार

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा येथील गवते वस्तीवर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भरधाव इंडिगो कार वीज वितरण कंपनीच्या डीपीला धडकून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडी डीपीला धडकता क्षणी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी डीपी पूर्णतः गाडीवर कोसळलेली होती. त्यात कारचा चक्काचूर झाला होता. त्याखाली दोन जण दबल्याने जागीच ठार झाले होते. तर अन्य दोघे गंभीर जखमी अवस्थेत गाडीत अडकले होते. नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान दोन्ही जखमींचा मृत्यू झाला.