Aurangabad : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संगीत रजनीचे आयोजन , पंचमदांच्या गितांची मैफल…

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २०१७ मध्ये संगीत रजनीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आता मार्च २०२० मध्ये देखील पुन्हा एकदा पोलीस कल्याण निधीसाठी आर. डी. बर्मन (पंचमदा) यांच्या गितांच्या कार्यक्रमाची मैफल ठेवण्यात आली आहे. यासाठी सिनेसृष्टितील मराठी कलावंतासह हास्य कलावंत देखील पाचारण करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बीडबायपास रोडवरील जाबिंदा लॉन्सवर आयोजित करण्यात आला आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या कार्यकाळात २०१३ मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर हास्य कलावंतांसह संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अमितेश कुमार हे कार्यरत असताना २०१५-१६ मध्ये जाबिंदा लॉन्सवर पॉप सिंगर मिकासिंगचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यानंतर यशस्वी यादव यांनी २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाचा कार्यक्रम एमजीएममधील सभागृहात ठेवला होता. या कार्यक्रमाला प्रत्येकी तब्बल ५० हजारांचे तिकीट होते. दरम्यान, राजेंद्र सिंग यांच्याच काळात पोलीस कल्याण निधीसाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला नव्हता. आता ७ मार्च रोजी पोलीस कल्याण निधीसाठी ७ मार्च रोजी पंचमदांच्या गितांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे ज्येष्ठ सिने कलावंत सचिन पिळगावकर यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय नटरंग फेम सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, जान्हवी अरोरा, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलावंत समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांना देखील पाचारण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे तिकीट दर साडे सातशे ते एक हजारापर्यंत आहे. या तिकीटांची विक्री करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना टार्गेट देखील देण्यात आले आहे.
……..
रकमेचे आॅडीट होणार का ?
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संगीत रजनीचा कार्यक्रम पोलीस कल्याण निधीसाठी घेतला जातो. त्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजकांकडून पैसा गोळा केला जातो. पोलीस कल्याण निधीसाठी म्हणून रक्कम स्विकारली जाते. नागरिक देखील पोलीसांच्या कल्याणासाठी मदत करतात. मात्र, आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमांच्या पैशांचे आॅडीट होऊन किती रक्कम जमा झाली. याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कार्यक्रमासाठी किती तिकीटांची विक्री झाली. त्यासाठी किती खर्च झाला याचे आॅडीट होणे आवश्यक असल्याची चर्चा पोलीस दलातील कर्मचा-यांमध्ये आहे