Aurangabad : नागरी वसाहतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद, औरंगाबादमधील घटना, सहा तासांचा थरार

औरंंंगाबाद : शहरातील सिडको एन-१ परिसरात शिरलेल्या बिबट्याला तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. मंगळवारी (दि.३) सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झालेला थरार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास थांबला. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर परिसरातील रहिवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
औरंगाबाद शहरातील सिडको एन-१ हा भाग उच्चभ्रु वसाहत म्हणून ओळखला जातो. मंगळवारी सकाळी एन-१ परिसरातील उद्यानात मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या काही नागरीकांना बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरीकांनी बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला आणि पोलिसांना दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व मोठा फौजफाटा सिडको एन-१ परिसरात दाखल झाला. तब्बल सहा तास वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देणा-या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देवून जेरबंद करण्यात वनविभागाला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यश आले. वन विभागाने पकडलेला बिबट्या पुर्णपण्ो वाढ झालेला असून त्याचे वय अंदाजे साडेचार ते पाच वर्ष असल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, सिडको एन-१ परिसरातील उद्यानात बिबट्या शिरला असल्याची माहिती वा-यासारखी शहरात पसरल्याने एन-१ भागात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.बघ्यांच्या गर्दीला आवरतांना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. सहा तासाच्या झुंजीदरम्यान बिबट्याने एका कुत्र्याचा आणि एका मांजरीचा फडशा पाडला असल्याची चर्चा सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात सुरू होती.