नवजात मुलींना दवाखान्यात टाकून धुम ठोकणा-या माता-पित्याविरूध्द गुन्हा दाखल

File Photo
औरंंंगाबाद : नवजात जुळ्या मुलींना दवाखान्यात टाकून धुम ठोकणा-या माता-पित्याविरूध्द अखेर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नवजात मुलींना दवाखान्यात टाकून धुम ठोकणा-या दांम्पत्याचा पत्ता पुर्ण नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित भिकुलाल भंडारी (रा.रामकृष्ण शाळेजवळ, शिवाजीनगर, सिल्लोड) यांनी आपल्या पत्नीला १९ ऑक्टोबर रोजी सिडको एन-९ परिसरातील निमाई हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. भंडारी दांम्पत्यास दोन जुळ्या मुली झाल्या होत्या. परंतु जन्मताच दोन्ही मुली अशक्त असल्याने त्यांना निमाई हॉस्पीटलमध्ये आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मुलींच्या उपचारासाठी तसेच त्यांचे पालन पोषण करण्यास असमर्थ असलेल्या मोहित भंडारी व त्यांच्या पत्नीने २१ ऑक्टोबर रोजी दोन्ही नवजात मुलींना दवाखान्यात सोडून धुम ठोकली होती. हा प्रकार हॉस्पीटल प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी भंडारी दांम्पत्याचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्याचे जमादार रमेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवजात मुलींना दवाखान्यात सोडून धुम ठोकणा-या माता-पित्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शिरसाट करीत आहेत.