सततच्या आजारामुळे सांभाळू शकत नसल्याच्या कारणावरून बापानेच आवळला दोन मुलांचा गळा

सतत आजारी असल्यामुळे मुलांचा सांभाळ करू शकत नाही म्हणून वडिलांनीच दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गावर हा प्रकार उघडकीस आला. गौरवी मोहिते (वय ११) आणि प्रतीक मोहिते (७) अशी मृत भावंडाची नावे आहेत.
मुंबईच्या घाटकोपरमधून चंद्रकांत मोहिते आणि त्याची दोन मुलं बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान बुधवारी पहाटे शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहिते याची कार आढळली. आरोपी मोहितेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कारची पाहणी केली असता, कारमध्ये दोन्ही मुले मृतावस्थेत आढळली. अधिक चौकशी केल्यानंतर चंद्रकांत मोहिते यानं दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. शिरवळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मोहिते कुटुंब मूळचं कोयनानगर, रासाटी (ता. पाटण) इथले असून, ते मुंबईतून घाटकोपर येथून बेपत्ता होते. चंद्रकांत मोहिते त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन कारनं कराडच्या दिशेने येत होते. आरोपी चंद्रकांत हा एकटा त्यांच्या मुलांचा सांभाळ करत होता. तसंच तो आजारानंही त्रस्त होता. यातून त्यानं चक्क आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारलं आहे अशी माहिती समोर आली आहे.